राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो – अजित पवार

0
696

मुंबई, दि.३० (पीसीबी)-  भाजपाचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. चिखलीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, असे म्हटले. तसंच त्यांची भेट ही सदिच्छा भेट होती, असेही ते म्हणाले. चिखलीकर हे नांदेडमधून भाजपाचे खासदार आहेत.

“राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो. चिखलीखर आणि माझी झालेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा करण्यात आली नाही. चिखलीकर यांना नांदेडला जायचं होते. त्यामुळे त्यांनी सकाळी लवकर भेट घेतली,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. “चिखलीकर यांची शुक्रवारीच भेट होणार होती. परंतु काही महत्त्वाच्या कामांमुळे काल आमची भेट होऊ शकली नाही. भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसून कोणताही गैरसमज होऊन देऊ नका,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी विश्वासदर्शक ठराव जिंकेल असेही ते म्हणाले. “शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलेला १७० चा आकडा आम्ही नक्कीच गाठू. आम्हाला जे लोक पाठिंबा देणार आहेत, ते आम्हाला देतील. जे दुसऱ्यांना देणार आहेत ते त्यांना देतील. बहुमतासाठी कोणीही कोणाच्या संपर्कात नाही,” असेही त्यांनी नमूद केले. “मी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, आताही राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये आगे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेन,” असेही त्यांनी नमूद केले. तसेच उपमुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.