रणांगण लोकसभेचे; मावळमध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार, शिवसेना डेंजर झोनमध्ये?

0
10287

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचाच अवधी बाकी आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच राजकीय वातवारण ढवळून निघायला सुरूवात होईल. राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीची तयारी कधीच सुरू केली आहे. इच्छुकांनी अंदाज घेत जुळवाजुळव चालविली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांत समावेश होता. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही मतदारसंघांपैकी मावळ मतदारसंघातील आजच्या राजकीय स्थितीचा अंदाज घेतल्यास मतदारसंघांत शिवसेनेची ताकद कमकुवत झाली आहे. ही स्थिती आगामी निवडणुकीपर्यंत कायम राहिली आणि भाजप-शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेनेच्या वाघासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. पिंपरी-चिंचवड ते मुंबईच्या समुद्रापर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच प्रमुख लढत होण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्ररचना झाली. या पुनर्रचनेनुसार २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. पुनर्ररचनेत मावळ लोकसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडपासून ते रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यापर्यंत विस्तारला आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे विधानसभा मतदारसंघ येतात. २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका भाजप व शिवसेनेने एकत्र लढविल्या. या दोन्ही निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. दोन्ही वेळेस या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

२०१४ ची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना स्वतंत्र लढली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. भाजपने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संस्थानिक राजकारण्यांचे मजबूत बालेकिल्ले उद्ध्वस्त करून ते भाजपने काबिज केले आहेत. भाजप हा आजच्या घडीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीत अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची राजकीय गणिते सुद्धा बदलली आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केल्यास दोन मोठ्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणारा मावळ लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या चर्चेचा मतदारसंघ बनला आहे.

खासदार शिवसेनेचा आणि सहापैकी तीन आमदार (चिंचवड, पनवेल आणि मावळ) भाजपचे, एक राष्ट्रवादीचा (कर्जत) आणि दोन आमदार शिवसेनेचे (पिंपरी आणि उरण), अशी या मतदारसंघाची राजकीय स्थिती आहे. या मतदारसंघातील दोन मोठ्या महापालिका पिंपरी-चिंचवड आणि पनवेल भाजपने काबिज केले आहेत. मावळ तालुक्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपालिका भाजपने जिंकल्या आहेत. याशिवाय मावळ पंचायत समिती तसेच तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या जागा व ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या वर्चस्वाला भाजपने कधीच धक्का दिलेला आहे. युती होवो अगर न होवो मावळ मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजप सज्ज आहे.

दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाची राजकीय ताकद राष्ट्रवादीची पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघातील येतात. साधारण आठ ते नऊ लाखांच्या आसपास मतदार या दोन विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी घेणाराच खासदार होतो, हा राजकीय संकेत आहे. सध्याच्या घडीला चिंचवड आणि पिंपरी या दोन्ही मतदारसंघात भाजपची हवा आहे. त्यानंतर राष्ट्रवादीची आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेची ताकद आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातही भाजपनंतर राष्ट्रवादीची राजकीय ताकद आहे. रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेपेक्षा शेतकरी कामगार पक्ष क्रमांक एकचा पक्ष आहे.

शेतकरी कामगार पक्ष हा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आहे. शेकापचे जयंत पाटील हे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच विधानपरिषदेचे आमदार झाले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शेकाप हा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करणार हे निश्चित आहे. त्यातच सर्वाधिक मतदार असलेल्या पिंपरी-चिंचवडध्ये शिवसेनेत बेबनाव आहे. शिवसैनिकांमध्ये विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे. बारणे यांनी पाच वर्षे स्वतः मोठे होण्यातच खासदारकीचा वापर केला. पक्षाचे पाच नगरसेवकही निवडून आणता आले नसल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत. या सर्व राजकीय परिस्थितीत आगामी निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजकीय अस्तित्व नगण्य ठरणार आहे. युती होणार की नाही यावरच या मतदारसंघात वाघाची डरकाळी घुमणार की नाही, हे स्पष्ट होईल. भाजप-शिवसेना युती न झाल्यास या मतदारसंघात निवडणुकीआधीच शिवसेनेचा वाघ जखमी होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मावळ मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीतच थेट लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने एकदिलाने काम केल्यास या मतदारसंघात भाजपसोबत कडवी टक्कर होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.