येरवड्यात रात्रभर दारूविक्री करणाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; महापालिका प्रशासन चक्रावले

0
803

पुणे, दि.५ (पीसीबी) : येरवड्यातील ‘हॉटस्पॉट’ परिसरात रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. संबंधित युवकाच्या कुटुंबातील सर्वांना क्वॉरंटाईन केले आहे. मात्र त्या युवकाने कितीजणांना दारू विक्री केली आहे याची माहिती मिळणे अवघड असल्यामुळे पोलिसांसह महापालिकेच्या येरवडा येथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे.

संपूर्ण लॉकडाउनच्या काळात पर्णकुटी व लक्ष्मीनगर पोलिस चौकीच्या हद्दीत या गावठी दारूसह विदेशी मद्य, गांजा, गुटखा, तंबाखुची खुले आम विक्री होत होती. त्यामुळे रात्रभर तळीराम या वस्त्यांमध्ये फिरताना दिसत होते. पोलिसांनी संबंधिताला किरकोळी कारवाई करून सोडून दिले होते. पोलिस चौकीच्या हद्दीतील हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहत असलेला युवक रात्रभर गावठी व विदेशी दारू, ताडी विक्री करीत होता. त्याला काही दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पण झाले. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र येरवडा पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र संबंधित युवकाला कोणामुळे कोरोना झाला? त्यानंतर त्याचा कितीजणांनी संपर्क आला हे सांगणे अशक्य असल्यामुळे तो राहत असलेल्या वस्तीतील रहिवासी भयभीत झाले आहेत.

‘‘डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात युवकाची आरोग्य तपासणी केली होती. त्याला कोरोना संशयीत म्हणून रुग्णालयात दाखल केले होते. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला.’’
– डॉ. माया लोहार, वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका