येरवड्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह

0
628

पुणे, दि. २६ (पीसीबी) – येरवड्यातील डॉन बॉस्को हायस्कूल मागील मोकळ्या मैदानात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी त्याचा खून झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.

मयत तरुणाचे वय अंदाजे २० ते २५ वर्ष असून त्याच्या अंगावर टिशर्ट आणि जीन्स पॅण्ट आहे. तसेच त्याच्या उजव्या दंडावर टॅट्यू गोंदलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी येरवड्यातील डॉन बॉस्को हायस्कूल मागील मोकळ्या मैदानात काही मुल क्रिकेट खेळत होती. त्यावेळी या मुलांना तेथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला कळवली. आणि तातडीने तेथे येरवडा पोलीस दाखल झाले. तरुणाचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.  याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे तपास करत आहेत.