वाकडमध्ये दोघांना जबर मारहाण करुन कारची तोडफोड

0
532

वाकड, दि. २६ (पीसीबी) – हॉटेलसमोर कार उभी केल्याच्या रागातून कारचालकासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण करुन कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना शुक्रवार (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास वाकड येथील हॉटेल लिवॉर्ड समोर घडली.

याप्रकरणी ओंकार पांडुरंग पाटील (वय २७, रा. कोस्टलाईन हॉटेलजवळ, पिंपळे सौदागर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हॉटेल लिवॉर्डचा मालक आणि तीन कामगार (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार पाटील हे त्यांचे मित्र अझर बाबासाहेब यांच्यासह जेवणाच्या बिलाचे पैसे देण्यासाठी लिवॉर्ड हॉटेलसमोरील पानटपरीसमोर त्यांची (एमएच/१६/एटी/४११७) या क्रमांकाची कार उभी करून एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. दरम्यान, हॉटेलसमोर मोटार उभी केल्याच्या कारणावरून हॉटेलचा मालक आणि तीन कामगारांनी फिर्यादी पाटील यांच्या हातावर व पाठीवर लोखंडी रॉडने व काठीने मारहाण केली. तर पाटील यांच्या मित्राच्या डोक्यात रॉड मारून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून मोटारीची काच फोडून नुकसान केले. या वेळी पाटील यांची दीड तोळ्याची सोनसाखळी गहाळ झाली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.