हिंजवडीत माथाडी संघटनेच्या नावाखाली नागरिकांना साडेतीन लाखांचा गंडा

0
527

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – अनंत माथाडी ट्रान्सपोर्टच्या आणि जनरल कामगार युनियनच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून नागरिकांकडून एकूण साडेतीन लाख रुपये उकळल्या प्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या एक ते दिड वर्षापासून हिंजवडी येथे सुरु होती.

याप्रकरणी रविंद्र रामचंद्र शेतसंधी (वय ३०, रा. विकास हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे निगडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज येवले आणि त्याचा भाऊ राहुल येवले या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मागील एक वर्षाच्या कालावधीत आरोपी मनोज आणि त्याचा भाऊ राहुल या दोघांनी अनंत माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून नागरिकांकडून एकूण साडेतीन लाख रुपये उकळले. तसेच त्यांची फसवणुक केली. याप्रकरणी रविंद्र याने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.