युतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची  तयारी ठेवा; अमित शहांचा शिवसेनेला इशारा  

0
1971

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य करणे कौशल्याने टाळले होते. मात्र, युती करण्याबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करायची किंवा नाही, याबाबत काही निर्णय घ्यायचा तो लवकर जाहीर करा, असा इशारा अमित शहा यांनी शिवसेनेला दिल्याचे समजते. हा इशारा देण्यामागे शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची रणनीती असू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आता शिवसेना युती करण्याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, भाजपने शिवसेनेवर दाबावतंत्राचा वापर करण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात सध्या भाजपच्या २२ तर, शिवसेनेच्या १८ जागा आहेत. एका पाहणी चाचणीत शिवसेना स्वबळावर लढल्यास शिवसेनेच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेला युती करून निवडणुकां लढण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान भाजपच्या अल्टीमेटमवर शिवसेनेने गांभीर्याने विचार कऱणार का? युतीचा निर्णय न झाल्यास विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना शिवसेना स्वळावर सामोरी जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आणि शिर्डी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली होती. मात्र, त्यांनी स्वळावर लढण्याचे भाष्य करणे खुबीने टाळले होते. त्यामुळे त्यांच्या मनात युती करण्याबाबत विचार सुरू असल्याचा विचार तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली होती.