युट्यूबवर व्हिडिओ पाहून चोरी करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
1253

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – युट्यूबवर व्हिडिओ पाहून वाकड पोलीस ठाणे हद्दीतील थेरगाव आणि परिसरात चोरीच्या दुचाक्या वापरुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तिन आरोपींना ३ लाखांचे १०० ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने आणि दोन चोरीच्या दुचाकींसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली असून आरोपींकडून एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.

महमद आरिफ उस्मानअली सय्यद, आयुब रियासत अलि (दोघे रा. कस्पटेवस्ती वाकड, मुळ गाव. उमरीकला, जि. मुरादाबाद उत्तरप्रदेश) आणि फहिम मतीन सिद्दीकी (रा. फुल चौक धुळे, मुळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहे. याप्रकरणी त्यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यांचा तपास घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक वाकड पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत होते. यावेळी उत्कर्ष चौक येथे आरोपी महमद, आयुब आणि फहिम हे तिघे संशयितरित्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी युट्यूबवर व्हिडिओ पाहून (एमएच/१४/सीए/३८१२ आणि एमएच/३०/एडब्ल्यू/४५०५) या दोन दुचाक्या चोरल्या आणि या दुचाक्यांचा वापर करुन त्यांनी परिसरातील लोकांच्या गळ्यातील सोने चोरले. पोलिसांनी त्यांकडून ५ चैनचोरीचे आणि १ वाहन चोरीचा असे सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच ३ लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने आणि दोन चोरीच्या दुचाक्या असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.