‘या’ शहरात सुरु होणार भारतातील पहिली “वॉटर मेट्रो”

0
362

मुंबई,दि.१३(पीसीबी) – महानगरामध्ये मेट्रोच्या सेवेमुळे उपनगरे एकमेकांना जोडली गेली आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय झालेली बघायला मिळत असते. परंतु असेही काही ठिकाणं आहेत, ज्यांना संपूर्णपणे पाण्याने वेढलेलं आहे. त्या ठिकाणी हवाई किंवा रस्ते वाहतुकीची सोय नाही. अशा वेळी त्या ठिकाणी जाण्यायेण्यास समस्या निर्माण होत असतात. परंतु आता या समस्येवर तोडगा निघताना दिसत आहे. कोचीत पहिली वॉटर मेट्रोसेवेला सुरुवात होत आहे.

या वॉटर मेट्रोमध्ये मोठ्या आणि लहान अशा दोन प्रकारच्या बोटी असतील. मोठ्या बोटी 100 प्रवासी घेऊन जातील तर लहान 50 प्रवासी घेऊन जातील. वॉटर मेट्रोची स्थानके पारंपारिक रेल्वे मेट्रोसारखीच आहेत. वॉटर मेट्रोचे आणखी पाच टर्मिनल्सचे बांधकाम सध्या सुरू आहे. ते या वर्षीच्या जुलै पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चेरानेल्लूर, उच्च न्यायालय, बोलगट्टी, व्यापीन आणि दक्षिण चित्तूर येथील टर्मिनल सध्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत. शिवाय, एलूर, कक्कनाड आणि व्हिटिला येथे टर्मिनलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हे सर्व कामे कोची मेट्रो रेल लिमिटेड म्हणजेच केएमआरएलमार्फत सुरु आहेत. व्यापीन-बोलगट्टी-उच्च न्यायालय हा वॉटर मेट्रोसाठी कार्यान्वित झालेला पहिला मार्ग आहे. ही सर्व मेट्रो स्टेशन कोचीन शिपयार्ड लिमिटेड द्वारे बांधली जात आहेत.

मार्चमध्ये व्‍यट्टिला आणि कक्कनड टर्मिनल दरम्यान पहिल्या वॉटर मेट्रोची ट्रायल घेण्यात आली होती. ट्रायल रन दरम्यान, बोटीने 5 किमीचे अंतर 20 मिनिटांत कापले. कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे कोची मेट्रो रेल लिमिटेडला किमान 5 बोटी वितरित केल्यानंतर वॉटर मेट्रो सेवा पूर्णपणे कार्यान्वित होईल. सरकारने अशी परिवहन सेवा सुरू करण्याची ही पहिलीच वेळ नसून आधीही बोट सेवा होती परंतु कक्कनड जेट्टी परिसरात फीडर सेवा नसल्याने तिला प्रवासी मिळू शकले नाहीत. दरम्यान, आता 10 बेटे आणि बोटयार्डमध्ये पसरलेल्या 38 टर्मिनल्सना जोडतील. 15 मार्गांचे एकूण अंतर 76 किमी आहे. हे मार्ग व्‍यपीन, मुलावुकड, व्‍यट्टिला, कक्कनाड, एलूर, नेट्टूर, कुंबलम, वेलिंग्‍टन, बोलगट्टी आणि एडाकोची प्रदेशात राहणार्या बेटांच्‍या प्रवासी समस्या सोडवण्यास सक्षम ठरतील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.