…या रक्त गटाला कोरोनाचा अधिक धोका

0
322

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या व्हायरस संदर्भात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. तसेच व्हायरसवर अनेक संशोधनं देखील करण्यात येत आहेत. जगभरातील अनेक वैज्ञानिक या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकदा असा दावा करण्यात आला होता की, उन्हाळ्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईल, तर अनेकदा असं सांगण्यात आलं की, वयोवृद्ध लोकांना या व्हायरसचा अधिक धोका आहे. परंतु, आता वेगवेगळ्या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा धोकाही वेगवेगळ्या प्रमाणात असल्याचं बोललं जात आहे. जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांनी यासंदर्भात दावा केला आहे.

जगभरात या व्हायरसवर अनेक संशोधनं केली जात असतानाच आता जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांनी कोरोनासोबत वेगवेगळ्या रक्तगटांच्या संबंधांचा अभ्यास केला. या संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांचा अहवाल ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांनी या संशोधनासाठी इटली आणि स्पेनमधील 1610 रुग्णांची निरिक्षणं नोंदवली. ज्यामध्ये अनेकांना कोविड-19मुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. हे सर्व रुग्णांची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर झाली असून त्यापैकी अनेकांचा मृत्यूही झाला आहे.

संशोधनातून काय समोर आलं?
संशोधनानुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका ‘A’ रक्तगट असणाऱ्या लोकांना आहे. तर ‘O’ रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका सर्वात कमी असल्याचं निष्पन्न झालं. संशोधातून निष्पन्न झाल्यानुसार, जर एखाद्या ‘A’ रक्तगट असणाऱ्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली तर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता ‘O’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांपेक्षा दुप्पट असू शकते.
दरम्यान, संशोधकांनी अहवालातून स्पष्ट केलं आहे की, ‘असं अजिबात नाही की, ‘O’ रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होऊच शकत नाही.’ तसेच ‘O’ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती युनिवर्सल डोनर म्हणून ओळखल्या जातात. म्हणजेच, जर दुसऱ्या कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज असेल तर त्याला ‘O’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचं रक्त दिलं जाऊ शकतं.