‘या’ कारणामुळे शिल्पा शेट्टी भोवती फिरतेय संशयाची सुई; पण, शिल्पाने या रॅकेटच्या खऱ्या सूत्रधाराच सांगितलं नाव

0
219

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या उद्योगपती राज कुंद्रा यांचे बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली आहे. गुन्हे शाखेच्या मते, कंपनीशी संबंधित राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि इतरांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सना बोलवण्यात आलं आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही.

या अधिकाऱ्यानं सांगितलं की, कुंद्रा यांचे बँक खाते आणि विवान इंडस्ट्रीजचे संयुक्त खाते, ज्यात शिल्पा शेट्टी दिग्दर्शक होत्या, याचीही चौकशी सुरु आहे. ही कंपनी कथित पॉर्न फिल्म प्रकरणाच्या मध्यभागी आहे. ते म्हणाले की, कुंद्राकडे अशी अनेक बँक खाती आहेत ज्यात परदेशातून पैसे जमा होते. या अधिकाऱ्यानं सांगितले की, शेट्टी यांनी संचालित केलेल्या कोणत्याही बँक खात्यातील व्यवहारांची माहिती आतापर्यंत तपासकार्यांच्या निदर्शनास आलेली नाही, सोबतच ‘हा तपासाचा भाग असल्यानं खात्यांची तपासणी केली जात आहे, त्यामुळे शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. मात्र, आम्ही कोणाच्याही वैयक्तिक खात्यांशी संबंधित नाही.’ 19 जुलै रोजी मुंबई गुन्हे शाखेनं अश्लील चित्रपट बनवून अॅपच्या माध्यमातून शेअर केल्याच्या आरोपाखाली कुंद्राला अटक केली होती.

पीएनबी बँकेत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे संयुक्त बँक खाते संशयाच्या भोवऱ्यात आहे. या खात्यात राज कुंद्रा पोर्नोग्राफी व्यवसायामधून पैसे जमा करत होते, ते पैसे शिल्पा शेट्टीसुद्धा वापरत होती. याखेरीज शिल्पा शेट्टीच्या नावावरुन व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून आणि क्रिप्टो चलनात गुंतवणूकीसंदर्भात पुरावेही समोर आले आहेत. मात्र, शिल्पा म्हणत आहे की तिला आपल्या पतीच्या या व्यवसायाची माहिती नव्हती आणि राज कुंद्रा यांनादेखील फसवलं जात आहे. या संपूर्ण रॅकेटचा खरा सूत्रधार शिल्पानं राजचा मेहुणे प्रदीप बक्षी असल्याचं सांगितलं आहे.