…म्हणून शरद पवार निवडणुकीचे मैदान सोडून पळाले; पंतप्रधान मोदींचा घणाघात   

0
599

सोलापूर, दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील हल्ला कायम ठेवला आहे. महाराष्ट्रात प्रचारसभेला आल्यानंतर मोदी पुन्हा-पुन्हा पवारांना लक्ष्य करत आहेत.  सोलापुरातील अकलूज येथील जाहीर सभेत भगव्या वादळाला घाबरुन शरद पवार मैदान सोडून पळाले, असा टोला  मोदी यांनी पवारांना आज (बुधवार) लगावला आहे. 

मोदी म्हणाले की, अकलूजमधील सभेसाठी  आलेला जनसागर  पाहून मला  लक्षात आले की शरद पवार  मैदान सोडून का पळाले.  शरद पवारही मोठे खेळाडू  असून त्यांना हवेचा अंदाज येतो. ते स्वत:च नुकसान होऊ देत नाहीत, म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, असे  मोदी म्हणाले.

महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य काही राज्यांमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.  या काहींचे प्राण  गेले आहेत.  तर शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांना  तातडीने मदत देण्यात यावी, असे आदेश अधिकाऱ्यांना  देण्यात आले आहेत, असेही  मोदींनी यावेळी सांगितले.  माढा मतदारसंघातील लोकांना मजबूत हिंदुस्थान पाहिजे की मजबूर, असा सवाल  मोदींनी यावेळी  केला.

२१ व्या शतकात भारताला  मोठी उंची गाठण्यासाठी   एका मजबूत सरकारची गरज आहे.  भारतासारख्या देशात एक  कणखर  नेता हवा आहे. २०१४ मध्ये मला दिलेल्या बहुमतामुळेच मला कठोर निर्णय घेता आलेत.  गरीबांच्या  उध्दारासाठी काम करु शकलो, असे मोदी म्हणाले.    काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले की, ही  ‘महामिलावट’ देशाला कधीच मजबूत बनवू शकत नाही.