…… म्हणून दररोज ५० ते १०० डोसचे टोकन आमच्याकडे द्या; नगरसेवकांची मागणी

0
353

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे योग्य प्रकारे नियोजन नाही. सामान्य नागरिक हे लसीकरणासाठी नगरसेवकांकडे येतात. नगरसेवकांना नागरिकांच्या समस्यांना तोंड दयावे लागते, यासाठी प्रत्येक नगरसेवकांना दररोज 50 ते 100 डोसेसचे टोकन द्यावेत, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली आहे. महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात महापौर उषा ढोरे यांनी क्षेत्रातील पदाधिकारी, नगरसदस्य यांची स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, अतिक्रमण, वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

दिघी येथील स्मशानभूमीमध्ये पावसाळ्यात नदीचे पाणी शिरते याबाबत स्मशानभूमी अन्यत्र स्थलांतरीत करण्यात यावी. दिघीमध्ये प्रशस्त उद्यानाची सोय व्हावी. स्थापत्य विषयक कामे अतिशय संथगतीने चालू आहेत. दिघीमध्ये जुन्या जकातनाक्याच्या इमारतीत महापालिकेचा छोटा दवाखाना आहे. तेथे बालकांचे लसीकरणाचे काम चालते तथापि शेजारी स्मशानभूमी असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. दिघी आळंदी मार्गावर प्रशस्त पालखी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. मात्र, तेथे भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. त्याचा पादचाऱ्यांना त्रास होण्याबरोबरच वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या निर्माण होत आहे. विद्युत केबलचे अंडरग्राऊंडचे कामात दुरुस्ती करावी लागत आहे. केबल तुटणे, विजपुरवठा खंडीत होणे यासारखे प्रकार घडत आहेत. 

उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य सागर गवळी, नगरसदस्या भिमा फुगे, निर्मला गायकवाड, प्रियंका बारसे, सोनाली गव्हाणे, विनया तापकीर, सुवर्णा बुर्डे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. शिवाजी ढगे, उपअभियंता मनिष चव्हाण, लता बाबर, प्रेरणा सिनकर, संदेश खडतरे, विजय वाईकर, प्रशासन अधिकारी नाना मोरे, राजेश वाघ, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

बैठकीत प्राप्त सूचना आणि विषयांबाबत महापौर ढोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. महापौर ढोरे म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले असेल तरच शहराच्या विकासाचा उपयोग आहे. याकरिता वैद्यकीय विभागाने लसीकरण मोहिम राबविताना दक्षता घ्यावी व सर्वांना लस मिळावी यासाठी सुयोग्य नियोजन करावे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. त्याला प्राथमिकता देणेत यावी. यासाठी सर्वांचे लसीकरण करुन घ्यावे. वैद्यकीय विभागाने लसीकरण मोहिमेत सुरळितपणा आणण्यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिक नागरिकांना लसीकरण करण्याबाबत प्राधान्य देण्यात यावे.