‘… म्हणून अरविंद फर्टीलायझरचा विक्री परवाना निलंबित’

0
258

पिंपरी, दि.३० (पीसीबी) : खताचा साठा शिल्लक असतानाही त्याची विक्री न करणाऱ्या एका खत विक्री त्या विरोधात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कारवाई केली. यांनी या खत विक्रेत्याचा परवाना सात दिवसासाठी निलंबित केला आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथील हा खत विक्रेता व्यापारी आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील नीरा येथील अरविंद फर्टिलायझर्स यांच्याकडे युरिया खताचा साठा शिल्लक असूनही शेतकऱ्यांकडून मागणी होत असतानाही ते विक्री करत नसल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर पुरंदर येथील पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी एस जी पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या कारवाईचा अहवाल कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक यांच्याकडे सादर केला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी संबंधित अहवालाचे पाहणी करून त्यामध्ये तथ्य आढळल्याने अरविंद फर्टिलायझर्स या खत विक्रेत्याचा परवाना सात दिवसासाठी निलंबित केला आहे.

एखादा खत विक्रेता युरिया जादा दराने विक्री करत असेल किंवा युरिया खताची साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तालुक्याच्या कृषी कार्यालयात तक्रार नोंदविण्याचे आवाहन कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.