“…म्हणून ईडीच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं सरनाईकांना द्यावीच लागतील”; व्हिडीओ पोस्ट करत भाजप नेत्याने उपस्थित केले प्रश्न

0
228

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरती सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथकाने मंगळवारी छापा टाकला. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं आणि विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटना क्रमानंतर विदेशातून परतलेल्या प्रताप सरनाईक यांनी, ‘फाशी दिलीत तरी चालेल पण तोंड बंद करणार नाही’, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या समोर सवाल उपस्थित केले आहेत.

“ठाकरे सरकारमधील नेतेमंडळी राजकीय दवाब आणून घोटाळे लवपण्याचा प्रयत्न करत आहेत का? तुमची संपत्ती विदेशात कशी काय? घोटाळेबाजांशी तुमचे संबंध काय? तुमच्याकडे बेनामी संपत्ती किंवा तुमचं बेनामी उत्पन्न आहे का? या महत्त्वाच्या प्रश्नांची प्रताप सरनाईक यांना उत्तरं द्यावीच लागतील”, असे किरीट सोमय्या ट्विटरवरील व्हिडीओच्या माध्यमातून म्हणाले. तसेच, कोणताही नेता किंवा वैयक्तिक व्यक्ती हा कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे ईडीच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतील.”, असेही सोमय्या यांनी ट्विट केले.

“सक्तवसुली संचालनालयाची कारवाई हा त्या खात्याचा दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. त्या खात्याने कोणत्या ठिकाणी कोणती कामे करावीत हा त्या खात्याच्या अधिकाऱ्यांचा प्रश्न असतो. त्यामध्ये भाजपचा काहीही संबंध नाही. पण काहीही झाले की भाजपच्या नावाने टीका करणे हे आता केंद्रातील विरोधकांचे कामच बनले आहे”, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रताप सरनाईक यांच्यासंदर्भात भाजपावर केल्या जाणाऱ्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिले.