मोठी बातमी…! तिन्ही दलात भरती प्रक्रियेच्या तारखा जाहीर…

0
295

देश,दि.१९(पीसीबी) – मागील दोन ते तीन दिवसांपासून केंद्राने आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातील युवकांकडून विरोध होताना दिसत आहे. देशातील अनेक भागांत यामुळे आंदोलने पेटली आहेत. असे असताना आज लष्कराने यासंबंधित पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये अग्निपथ योजनेची सविस्तर देण्यात आली आहे. या योजनेवर दोन वर्षांपासून चर्चा सुरु असून लष्कराचा फायद्याच्या दृष्टीकोनातून विचार करुन ही योजना आणली असल्याची माहिती लष्करातील अतिरिक्त सचिव लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी यांनी दिली आहे.

आज अग्निपथ संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, या योजनेचा उद्देश तरुणांमध्ये उत्साह निर्माण करणे हा आहे. अग्निपथ योजना तरुणांसाठी फायदेशीर असून सर्व अग्निवीरांना सामान्य सैनिकांसारखे फायदे मिळणार आहेत. आजच्या तुलनेत अग्निवीरांना अधिक भत्ते आणि सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. निवृत्तीच्या प्रश्नावर पुरी म्हणाले, तिन्ही सेवांमधून दरवर्षी सुमारे 17, 600 सैनिक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार, असे त्यांना कोणी विचारण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. त्यामुळे ही योजना तरुणांच्या भवितव्यासाठी जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सैन्यभरतीसाठी ‘टूर ऑफ ड्युटी’ या नावाने प्रस्तावित असलेली योजना ‘अग्निपथ’ असे नवे नामकरण करून घोषित करण्यात आली. सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता ‘अग्निपथ’ योजनेतून साकार होणार.

सचिव पुरी म्हणाले की, देशसेवेसाठी लढत असताना जर अग्निवीरांना प्राणांती आहुती द्यावी लागली तर त्यांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. ‘अग्निवीर’ म्हणून कार्यरत असताना सियाचीनसारख्या भागात असेल तर सध्याच्या सैनिकांना जे भत्ते आणि सुविधा लागू आहेत, तेच लागू राहणार आहेत. त्यांच्याशी सेवेच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

यावेळी पत्रकार परिषदेत एअर मार्शल एस. के. झा म्हणाले, भारतीय हवाई दलात अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा समावेश करण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असून त्याअंतर्गत नोंदणी सुरू होईल. एक महिन्यानंतर म्हणजे 24 जुलैपासून पहिला टप्प्यातील अग्निवीरांच्या ऑनलाइन परीक्षा सुरु होणार आहेत. डिसेंबरच्या अखेरीस अग्निवीरची पहिली तुकडी हवाई दलात दाखल होईल. बॅचचे प्रशिक्षण ३० डिसेंबरपूर्वी सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

नौदलाचे व्हाईस अॅडमिरल डी. के. त्रिपाठी म्हणाले, नौदला आमची भरती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. 25 जूनपर्यंत यासंदर्भातील जाहिरातीची माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. महिनाभरात भरती प्रक्रिया सुरू होऊन पहिला अग्निवीर 21 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण संस्थेत उपस्थित असेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी तपशील जारी केला आहे. यात IAF ने म्हटलंय की, अग्निपथ ही सशस्त्र दलांसाठी नवीन मानव संसाधन व्यवस्थापन योजना आहे. या योजनेद्वारे समाविष्ट केलेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून संबोधले जाणार आहे. हवाई दल कायदा 1950 अंतर्गत चार वर्षांसाठी त्यांची भरती केली जाणार आहे. देशाच्या सर्व भागातून अग्निवीर म्हणून उमेदवारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.