मोठी कारवाई: पुण्यात ट्रकमधून सव्वा कोटींचा गांजा जप्त; चौघे अटकेत

0
563

पुणे, दि. २२ (पीसीबी) – ट्रकमधून घेऊन निघालेल्या  १ कोटी २५ लाख रुपये किमतीचा ८३५ किलो वजनी गांजा  डीआरआय (डिरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) च्या पुणे विभागाच्या पथकाने जप्त करुन चौघांना अटक केली आहे. ही कारवाई मंचर निरगुडकर रस्त्यावरील पिंपळे गाव खडकी येथे करण्यात आली.

याप्रकरणी गुंडू राव पाटील, अमित ज्ञानेश्वर बिडकर, दीपक, इलयाबकास बाबमिया मुंडे आणि नासीर गफूर पठाण या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मंचर निरगुडकर रस्त्यावरून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून पिंपळेगाव खडकी येथे सापळा रचून एक ट्रक पकडला. या ट्रकसमोरच एक इनोव्हा गाडी जात होती. या दोन्ही गाड्यातील चौघा जणांना ताब्यात घेऊन डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. ट्रकची तपासणी केली असता त्यात लपवून ठेवलेले १४९ बॉक्स आढळले. या बॉक्समध्ये तब्बल ८३५ किलो गांजा होता. हा गांजा, वाहतूक करणारा ट्रक आणि इनोव्हा गाडी असा १ कोटी २५ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.