मेट्रो बोगद्याचे काम पुन्हा नव्या जोमाने सुरू

0
342

पुणे, दि. ९ (पीसीबी) – पुणे शहरातील मेट्रोच्या उन्नत मार्गिकेसह (एलिव्हेटेड) भुयारी मार्गातील बोगद्याच्या निर्मितीच्या कामालाही महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) सुरुवात केली आहे. महामेट्रोकडे सध्यातरी मजुरांची संख्या पुरेशी असली, तरी हे सर्व मजूर आगामी काळात कामावर टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बोगद्याचे काम वेळेत पूर्ण झाले तर येत्या वर्षभरात स्वारगेट ते पिंपरी मेट्रोसाठी हा मार्ग उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात महामेट्रोने पावसाळ्यापूर्वीच्या शहरातील कामांना सुरुवात केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने नदीपात्रात टाकलेला भराव काढून घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रोने कामाचा पसारा वाढवला असून, शहराच्या सर्व भागांतील कामे सुरू केली आहेत. पिंपरीतील मार्गिका आणि स्टेशनच्या कामांसह वनाझ ते गरवारे कॉलेज मार्गावरील उर्वरित कामांना गती दिली गेली आहे. त्याशिवाय गेल्या ३५-४० दिवसांपासून पूर्ण बंद पडलेल्या भुयारी मार्गातील बोगद्याच्या खोदाईला सुरुवात झाली आहे. महामेट्रोच्या दोन टनेल बोअरिंग मशिनच्या (टीबीएम) माध्यमातून ही खोदाई सुरू होती; पण करोनाच्या संकटामुळे हे काम थांबवावे लागले होते. दोन्ही टीबीएमद्वारे सध्या शिवाजीनगर स्थानकापर्यंतचे बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, आता धान्य गोदामाच्या (सिव्हिल कोर्ट) दिशेने खोदकाम सुरू झाल्याची माहिती महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) अतुल गाडगीळ यांनी दिली. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी दोन्ही मशिन पूर्ण क्षमतेने काम करत असली, तरी सध्या त्याचा वेग मर्यादित ठेवण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महामेट्रोकडे सध्या दोन ते अडीच हजार मजूर कार्यरत आहेत. शहरातील अनेक मजूर त्यांच्या गावी परत जात असल्याने याही मजुरांना परतीचे वेध लागले आहेत. मात्र, करोनापासून बचावाच्या सर्व सुविधा या कामगारांना पुरविण्यात आल्याने सध्यातरी ते कामावर येत आहेत. शहरातील लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर या मजूरांना कामावर टिकवून ठेवण्याची जबाबदारी महामेट्रोवर आहे. बहुसंख्य मजूर गावी निघून गेल्यास मेट्रोच्या कामावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे.

पुणे शहरात कोरोनाचा प्रसार वाधतो आहे. महामेट्रोतर्फे कामगारांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या निवासाच्या ठिकाणी आणि कामावर आल्यानंतर डॉक्टरांकडून तपासणी केली जात असून, हँड सॅनिटायझर, मास्क आणि इतर सुरक्षा साधने त्यांना पुरविण्यात आली आहेत. कामगारांनी गावी परत न जाता मेट्रोच्या कामावरच थांबावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ता (इन्सेटिव्ह) देण्याचे मेट्रोच्या काही कंत्राटदारांनी जाहीर केले आहे.