छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती घरामध्येच साजरी करावी! शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांचे शंभू भक्तांना आवाहन

0
328

प्रतिनिधी, दि.९ (पीसीबी) – कोरोना व्हायरस या महामारीच्या रोगामुळे राज्यशासनाने सर्वत्र लाँकडाउन जाहीर केले आहे. तर १४ मे ला श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वत्र ही जयंती उत्साहात साजरी केली जाते.

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आपापल्या घरातच राहुन साजरा करावा.जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातल्याने आपल्या जनतेचे आपली प्रथम जबाबदारी आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीमध्ये कोणताही खंड पडू नये म्हणून यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह घरातच महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन साजरा करूया.

आपल्या राजाने ज्याप्रकारे रयतेचे संरक्षण केले त्याचप्रकारे त्यांची शिकवण एकवटून आपणही जनतेला किंवा प्रशासनाला कोणताही त्रास अथवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती येत्या १४ मे ला घरातच साजरी करण्याचे आवाहन शिवाश्रम चे संस्थापक अध्यक्ष शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी सर्व शंभुभक्तांना केले आहे.

तसेच सर्व नागरिकांनी या आवाहनाचे पालन करुन कोरोना महामारीला हरवण्यास सज्ज व्हावे. घरातच रहा, सुरक्षित रहा व स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या असा संदेश शिवाश्रमाचा वतीने देण्यात आला आहे.