मूर्ती आमची, किंमत तुमची, पर्यावरणस्नेही गणेश मूर्तींचे दालन दिनांक 21 ऑगस्ट पासून सुरू होणार

0
469

– शंकर महाराज ट्स्टसेवा मंडळाच्या उपक्रमाचे नववे वर्षे

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड या धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्थेतर्फे गेली 30 वर्षे वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर आयोजनापासून संस्थेची सुरुवात झाली. गणेशोत्सवाच्या वेळी दरवर्षी शुद्ध शाडू मातीच्या व हळद ,कुंकू,बुक्का,गुलाल,इ. नैसर्गिक रंगातच रंगविलेल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींचे दालन हा या संस्थेचा अभिनव उपक्रम लोकप्रिय ठरला असून त्याचा आरंभ २१ ऑगस्ट (रविवार) पासून होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक डॉ. अविनाश वैद्य यांनी दिली.

,”मूर्ती आमची किंमत तुमची” चे हे नववे वर्ष आहे. वेगवेगळ्या आकारातील श्री गणेशाच्या सर्वांचे चित्त वेधून घेतील अशा मूर्ती असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मूर्तींना किंमत लावली जात नाही. भाविक या दालनास भेट देऊन त्यांच्या पसंतीची श्री गणेशमूर्ती निवडतात आणि या संस्थेच्या विविध उपक्रमांना आर्थिक मदत म्हणून दान पेटीत भरभरून गुप्तदान टाकतात. यातून जमा झालेली पै आणि पै सत्कारणीच लागेल अशी समाजाची खात्रीच असल्यामुळे या सर्व योजना आज पर्यंत यशस्वी झाल्या आहेत.

या वर्षी “मूर्ती आमची किंमत तुमची” हे पर्यावरणस्नेही गणेश मूर्तींचे दालन दिनांक 21 ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी 5 वाजल्या पासून ते 31 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी 10 वा पर्यंत गंधर्व हॉल,पू. ना. गाडगीळ सराफ दुकानाचे वर,चापेकर चौक चिंचवड गाव पुणे 411033 येथे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरू आहे.

संस्थेच्या वतीने आजपर्यंत 1500 हून अधिक यशस्वी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून हा एक विक्रमच आहे. लाखो रुग्णांना रक्तसंजीवनी मिळाल्याचे समाधान आहे. संस्था आरोग्य,शिक्षण,पर्यावरण या क्षेत्रात संस्था काम करत आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत अशा अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने मदत केली आहे. गरीब रुग्णांना त्यांच्या दुर्धर आजारावरील उपचारार्थ सहाय्य केले आहे, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड या संस्थेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘स्नेहसावली- आपलं घर ‘हा निःशुल्क वृध्दाश्रम , यामध्ये समाजातील निराधार ज्येष्ठांचा मोफत सांभाळ केला जातो. त्यांच्या निवास, भोजन, कपडालत्ता, मनोरंजन,आणि सर्वात महत्त्वाचे वैद्यकीय मदत या सर्वांचा भार संस्थाच उचलत असते.

या सर्व उपक्रमासाठी लागणाऱ्या निधीसाठी या संस्थेतर्फे अभिनव योजना राबवल्या जातात. संस्थेचे स्वयंसेवक घरोघर जाऊन वर्तमान पत्राची रद्दी,आणि घरोघर तयार होणारे स्क्रॅप (भंगार) गोळा करतात. त्यांचा शक्य असल्यास पुनर्वापर केला जातो अथवा ते विकून निधी उभारला जातो, अशा या आगळ्या वेगळ्या संस्थेसाठी लोक गणेश मूर्ती उपक्रमातून मदत करत असतात.