मुलायमसिंह-मायावती एकत्र येतात, मग शिवसेना-भाजप का येऊ शकत नाहीत ? – मुख्यमंत्री

0
542

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंह आणि मायावती हे दोन नेते राजकारणासाठी एकत्र येऊ शकतात. तर शिवसेना आणि भाजपची युती का होऊ शकत नाही ?, असा सवाल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मतांची विभागणी  होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होऊ नये, यासाठी शिवसेनेशी युती करण्याची आमची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी युतीवर भाष्य केले. उध्दव ठाकरे यांच्याशी माझे चांगले  संबंध आहेत.  शरद पवार यांची सार्वजनिक कार्यक्रमात जशी भेट घेतो. तशीच  ठाकरे यांचीही भेट घेतो. अशा भेटी मीडियासमोर  घेतल्या जात  नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका  एकत्रित घेण्यात येऊ नयेत, अशी माझी भूमिका आहे. शिवसेना – भाजपची युती गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाच जागांवरून संपुष्टात आली होती.  त्यामुळे  या वेळी तसे काही होऊ नये, यासाठी आतापासूनच चर्चा करण्यात यावी, असे आमचे मत आहे. असे ते म्हणाले.  राज्यात २०१९ नंतर मीच मुख्यमंत्रिपदी कायम  राहील, असा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.