भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट  

0
916

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी  आज (बुधवारी) सकाळी ‘मातोश्री’ वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी  दोघांमध्ये  जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. मात्र,  कोणत्या विषयावर चर्चा झाल्याचे अद्याप समजू शकलेले नाही.

शिवसेनेकडून सध्या आपल्या मुखपत्र सामनामधून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. मित्रपक्षांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचा भाग म्हणून  मुरली मनोहर जोशी यांनी  उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची सांगितले जात आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष कायम  आहे. शिवसेना भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेनेकडून वारंवार   स्पष्ट करण्यात आले  आहे. त्याचबरोबर लोकसभेतील मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावात शिवसेनेने तटस्थ भूमिका घेऊन भाजपला सुचक इशारा दिला होता. दरम्यान, मुरलीमनोहर जोशी यांनी उध्दव ठाकरे यांच्यासोबत कोणत्या विषयावर चर्चा केली, याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे.