मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आमदार अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान!

0
521

मुंबई, दि. १९ (पीसीबी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी आपला आमदारकीचा राजीनामा  देण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. आपण दोन अटींवर राजीनामा मागे घेत असल्याचे त्यांनी विधान भवन परिसरात आज (सोमवार) सांगितले.

गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देणार नाही. त्याचबरोबर धुळे महापालिकेची निवडणूक गोटेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, या अटी मुख्यमंत्र्यांनी साडेतीन तास चाललेल्या बैठकीत मान्य केल्याचे गोटे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यात कोणताही दगाफटका झाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपमध्ये गुंड प्रवृतीच्या लोकांना प्रवेश दिल्याच्या कारणावरून गोटे यांनी पक्षाचे राज्य अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला होता.  पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा अवमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिले जात असल्याबाबत गोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.