मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणार नाही; शाहू महाराज, जयसिंगराव पवारांची घोषणा

0
404

कोल्हापूर, दि. १ (पीसीबी) – मराठा समाजाने याआधी ५८ मोर्चातून निवेदने दिली असतानाच आता कसली चर्चा ?, असा सवाल करून मराठा आरक्षणासंदर्भात गुरुवारी (दि.२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी घोषणा कोल्हापूरमधील राजर्षी शाहू महाराज, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी आज (बुधवार) येथे केली.    

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत गुरूवारी बोलावलेल्या बैठकीसाठी शाहू महाराज, जयसिंगराव पवार आणि प्रतापसिंह जाधव यांना बोलावले होते. या पार्श्वभूमीवर आज शाहू महाराज आणि जयसिंगराव पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी गेल्या चार वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. आरक्षण कसे देता येईल, या संदर्भातील माहिती सरकारला दिली. पण तरीही सरकार निर्णय न घेता चालढकल करत आहे. त्यामुळे या बैठकीला जाण्याची गरज नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

त्यानंतर शाहू महाराज आणि जयसिंग पवार यांनी मुंबईतील चर्चेसाठी जाणार नाही, असा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती त्यांनी दुरध्वनीवरुन प्रतापसिंह जाधव यांना दिली. त्यांनीही आंदोलकांच्या भावनांचा आदर करत बैठकीला जाणार नाही, असे सांगितले.