मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच पुणे दोऱ्याला नाट, एकनाथ शिंदे उद्यान नामकरणामुळे उद्घाटन सोहळा रद्द..

0
198

पुणे, दि. २ (पीसीबी) : नाशिक, औरंगाबादचा दौरा संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर एक उद्घाटन सोहळा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यांच्या हस्ते पुण्यात होणाऱ्या ‘एकनाथ शिंदे उद्याना’चा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार काही स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर संबंधित उद्यान उभारण्यात आल आहे. शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिले होते. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा सर्व खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला होता. या प्रमाणे घरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती असाही त्यांनी दावा केला होता.

मात्र या नामकरणाला अद्याप प्रशासकीय मान्यता नाही, असा दावा करत काही हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार काही स्वयंसेवी संघटनांनी केली होती. तसेच या कार्यक्रमाबाबतही महापालिकेला अंधारात ठेवण्यात आले होते. याबाबत आज काही वृत्तपत्रांनी आणि चॅनलने वार्तांकन केले. त्यानंतर पुढील अकारण होणारा वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने उद्घाटन कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती आहे.
पुण्याच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनीही कार्यक्रम रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.