मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम बंद  नाहीत; यूजीसीचा खुलासा

0
719

नाशिक, दि. १३ (पीसीबी) – मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम बंद करण्यात आलेले नाहीत, असा खुलासा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)  केला  आहे. ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत,  त्या दूर करण्यासाठी विद्यापीठांना एक महिन्याची मुदत देण्यात आली  आहे, असेही यूजीसीने  सांगितले.

अभ्यासक्रम रद्द झाल्याचे वृत्त येताच मुक्त विद्यापीठांना आज (सोमवार) यूजीसीकडून पत्र प्राप्त झाले आहे. या संबंधित अधिक माहिती १६ ऑगस्टला यूजीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

यूजीसीने २०१८ -१९ वर्षासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये मुंबई दूर आणि मुक्त अध्ययन केंद्र (आयडॉल) संस्थेसह ३५ संस्थांची नावेच नसल्याने त्यांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे, असे वृत्त रविवारी (दि.१२) आले होते.

या वृत्तानंतर विद्यार्थ्यांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले  होते. अखेर यूजीसीने याबाबत खुलासा केल्याने  विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.