मुंबई बंद स्थगित; समन्वयकांचे आंदोलकांना शांततेचे आवाहन

0
459

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला मुंबई बंद अखेर स्थगित करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती सकल मोर्चाचे समवन्वयक वीरेंद्र पवार यांनी आज ( बुधवार ) दुपारी दादरमध्ये पत्रकार परिषदेत दिली.  तसेच ठाणे आणि नवी मुंबई बंदही स्थगित करण्याचे आणि शांततेचे  समन्वयकांनी आंदोलकांना आवाहन केले आहे.

मराठा समाजाची पिळवणूक, फसवणूक झाली आहे. त्यामुळे आता मूक नाही तर ठोक मोर्चा काढण्याचा निर्धार केला. मराठा समाजाचा अपमान आणि अन्यायाविरुद्ध हा बंद पुकारल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.

सरकारमुळे आमच्या हातात दगड, काठ्या आल्या. काही जणांना त्रास झाला, त्यांची क्षमा मागतो, पण सरकारने याची दखल घ्यायला हवी. राजकीय हेतूने बंद पेटल्याचा संशय आहे, असेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. याच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने  ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज मुंबई बंदची हाक देण्यात आली होती.