मुंबईतील दादर परिसरात सकाळी बत्ती गूल

0
306

मुंबई, दि. २६(पीसीबी) : मुंबईतील दादर परिसरात सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. याच परिसरात आज स्काऊट्स आणि गाईड्स राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित कऱण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते हा पुरस्कार समारंभ होत आहे. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच वीज पुरवठा खंडित झाला. साधारणत: अर्ध्यातासाने हा वीज पुरवठा आता सुरळीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील दादर, वांद्रे, माहिम आणि सांताक्रुझ परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. काही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाला. अचानक वीज गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वीज पुरवढा खंडित झाल्याने बेस्ट कडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि वीज पुरवठा सुरळीत केला.

सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास कळवा-पडघा येथील 400 केव्हीची लाईन ट्रिप झाली. याचा परिणाम म्हणजे मुंबई, ठाणे परिसरात होणाऱ्या वीज पुरवठ्यावर झाला. त्यानंतर तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आणि वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. जवळपास अर्ध्या तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे.