लेखापरीक्षणासाठी दोन निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

0
200

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – लेखापरीक्षण कामकाजाची व्याप्ती व अनुभवी कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे लेखापरीक्षण कामकाजावर मर्यादा येत असल्याने महापालिकेमार्फत लेखापरीक्षणाचा अनुभव असणाऱ्या दोन सेवानिवृत्त अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखा विभागामार्फत लेखापरीक्षणाचे कामकाज केले जाते. सद्य:स्थितीत या कार्यालयामार्फत सन 2010 ते 2018  या कालावधीतील विविध विभागांचे लेखापरीक्षण केले जात आहे. तथापि, मार्च 2020 पासून उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे तसेच मनुष्यवळाच्या कमतरतेअभावी लेखापरीक्षणाचे कामकाज मागे राहिले आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागातील प्रचलित पद्धतीनुसार सर्व कार्यालयांचे 100 टक्के लेखापरीक्षण करण्यात येत आहे. महापालिकेच्या कामकाजाचा वाढता व्याप विचारात घेता लेखापरीक्षणाच्या कामकाजातही वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत मुख्य लेखापरीक्षण विभागामार्फत लेखापरीक्षणाचे कामकाज सहा गटांमार्फत करण्यात येत आहे.

सध्या 2015-18 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरु झाले असून हे कामकाज लवकरात-लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचारी यांची संयुक्त पथके तयार करून लेखापरीक्षण कामकाज प्रगतिपथावर नेण्याचे कार्यालयाचे नियोजन आहे. तथापि, लेखापरीक्षण कामकाजाची व्याप्ती व अनुभवी कर्मचाऱ्यांचा अभाव या बाबी विचारात घेता तांत्रिक कामकाजाचे लेखापरीक्षण करताना कामकाजावर मर्यादा येत आहेत.

याकरिता लेखापरीक्षण कामकाजाचा अनुभव असणाऱ्या दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुढील सहा महिने कालावधीसाठी लेखापरीक्षण कामकाजाकरिता मुख्य लेखापरीक्षण विभागात नियुक्ती देण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांमध्ये लेखा विभागाचे सेवानिवृत्त सहायक संचालक हनुमंत कांबळे आणि लेखाधिकारी भालचंद्र पटवर्धन या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 17 डिसेंबर 2016 रोजीच्या निर्णयानुसार या अधिका-यांचे वेतन व भत्ते निश्चित करण्यात येणार आहेत.