मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव असा असणार…

0
236

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – सार्वजनिक गणेशोत्सवावरही यंदा कोरोनाचेच सावट आहे. मूर्तीची उंची कमी होणार आहेच, पण त्याचबरोबर मंडळांना अनेक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाहीच, पण हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन कार्यक्रमांना केवळ १० कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहावे लागणार आहे.

मुंबईत साधारणत: साडेबारा हजार गणेशोत्सव मंडळे असून त्यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव तडीस नेणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. दरवर्षी गणपती मंडळांना पालिका, पोलीस यांच्या परवानग्यांचे विघ्न पार पाडावे लागते. गेल्या वर्षी मुंबईतील अनेक पूल बंद केल्यामुळे विसर्जन मिरवणुकांवर काहीसे निर्बंध आले होते. यंदा मात्र करोनामुळे संपूर्ण गणेशोत्सवावरच निर्बंध आले आहेत.

पालिकेने या वर्षी गणपती मंडळांना गेल्या वर्षीच्या परवानगीच्या आधारेच मोफत परवानगीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याकरिता सर्व मंडळांना लेखी हमीपत्र द्यावे लागणार आहे. करोनाचा संसर्ग किंवा फैलाव होऊ नये या दृष्टीने या हमीपत्रात पालिकेने अनेक अटी घातल्या आहेत. त्यात गणेशमूर्तीची उंची चार फुटांपेक्षा कमी असेल ही मुख्य अट आहे. गर्दी होऊ नये म्हणून मंडपाचे आकारमानही कमी ठेवावे लागेल.

नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई
गणेश मंडळांना अशा १९ अटींचे पालन करावे लागणार आहे. या अटींचे पालन न केल्यास अशा मंडळांवर साथरोग कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. भाविकांना गणेशमूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन, भेट घेता येणार नाही. ऑनलाइन दर्शनच घ्यावे लागणार. प्रसाद, फुले, हार अर्पण करता येणार नाहीत. मंडळांना प्रसाद वाटता येणार नाही. गणेशोत्सव मंडळांसाठीची नियमावली पुढीलप्रमाणे आहे.

  • * मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.
  • * मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे.
  • * मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.
  • * आरतीला मंडपात जास्तीत जास्त दहा कार्यकर्त्यांना प्रवेश. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही.
  • केवळ दहा कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक.
  • * मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.
  • * भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
  • * कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे.
  • * ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून करोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे.