मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा   

0
460

अहमदनगर, दि. १४ (पीसीबी) – मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, कोणी दम दिला, तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो. मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता इशारा दिला.

कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमोर भाजप मंत्री राम शिंदे यांचे आव्हान आहे. सभेत बोलताना अजित पवार यांना काही जणांकडून परिसरात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले. यावर बोलताना पवार म्हणाले  की,  आम्ही काय असं-तसं इथं आलं आहोत का? आम्ही काय बांगड्या घातलेल्या नाहीत. ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात,  हे दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांनी विसरु नये.

आमच्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावण्याचा, दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, तर मला सांगा. मग त्या दम देणाऱ्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो.  आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला,  तर त्यांच्याकडे बघून घेईन, असाही इशारा पवार यांनी यावेळी दिला.