मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
467

सातारा, दि. १२ (पीसीबी) –  मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही, मुंबईत बसून व्याख्यान देण्यापेक्षा त्या लोकांनी येथे येऊन दुष्काळाची पाहणी करावी, तेव्हाच तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती समजेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.  

शरद पवार  यांनी आज (रविवार)  साताऱ्यात दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी  त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत ‘जाणता राजा’ किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावे, असे खुले आव्हान चंद्रकांत पाटील यांनी  शरद पवारांना दिले होते. या विधानाचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला.

शरद पवार म्हणाले की,  मी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी जिथे-जिथे फिरलो आहे. तिथले लोक मला सांगत आहेत की, गावांमध्ये पिण्यासाठीदेखील पाणी नाही. पाणी खूप दिवसांनी येते. चारा छावण्यांमध्येदेखील खूप कडक नियम आहेत. रोजगार हमी योजनेत लोकांना कामे मिळत नाही.