‘मीच इथला भाई आहे’, असे म्हणत तरुणाला मारहाण

0
384

तळेगाव दाभाडे, दि. २० (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून तरुणाला पाठलाग करून त्याच्या घरात घुसून मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी तरुणाची आई आली असता तिलाही ढकलून देत कोयत्याचा धाक दाखवला. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री डाळ आळी तळेगाव दाभाडे येथे घडली.

सुमित भगवान शेळके (वय 18, रा. डाळ आळी, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सरोदे, प्रतीक खोमणे, शुभम आडके, गड्डी आढागळे (सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून हातात कोयते आणि काठ्या घेऊन फिर्यादीचा पाठलाग केला. तसेच फिर्यादी यांच्या घरात बसून त्यांना काठीने मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांच्या आई मध्ये आल्या असता त्यांनाही आरोपींनी ढकलून दिले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून ‘मीच इथला भाई आहे’, असे म्हणत आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.