मिळकत कर सुविधा द्या, नंतर मिळकत कर लावा – सोसायटी ची मागणी

0
343

चिखली, दि. ११ मे (पीसीबी) – टाळगाव चिखली हे पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर येथील बऱ्याच भागात कसल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही. उलट मिळकत कर वसुली पालिका प्रशासनाने ४५ टक्के केली आहे. एकीकडे असे असले तरी दुसरीकडे परिसरातील सोयीसुविधा आहे तशाच आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवत असलेले झीरो वेस्ट काही भागात पूर्णतः अपयशी ठरले आहे. रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग रोज पडलेले आहेत कचरा कुंडी ची गरज असल्याचे जाणवते.

सोसायटी कडे येणारे जाणारे रस्ते साफसफाई नसणे , डांबरीकरण रखडणे , रस्त्यावरील पोल लाईट अभाव , सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा अभाव , पाणी पुरवठा तक्रारी दाखल न घेणे , प्रॉपर्टी टॅक्स मधील एसटीपी आणि खतनिर्मिती प्लांट असल्यामुळे मिळणारी टॅक्स सवलत न मिळणे इत्यादी अनेक कारणांमुळे, आधी सोयीसुविधा द्या त्यानंतर मिळकत कर लावा, अशी मागणी  कोलोसस ग्रीन सिटी फेज -१ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांनी प्रॉपर्टी टॅक्स बिल घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना केली आहे .

प्रॉपर्टी टॅक्स बिल हे कर विभागाकडून सुविधा न देताही बळ पूर्वक पैसे उकळायचे साधन आहे आणि सोसायटी त्याचा विरोध करीत आहेत. मिळकत कर विभागाकडून सांगण्यात येत आहे की, आकारणी करण्यात आलेला प्रॉपर्टी टॅक्स (मिळकत कर) आणि सुविधा देणारा विभाग हे वेगळे वेगळे आहेत आणि सोसायटी ला दबावाखाली आणले जाते आहे.

किमान पायाभूत सुविधा द्या असे,कोलोसस ग्रीन सिटी सोसायटी अध्यक्ष श्री. आशिष सातकर यांनी सांगितले की, ४ वर्षांची ची ४ बिले आत्ता पर्यंत सोसायटी सभासद यांना मिळाली आहेत , सोसायटी मध्ये महानगरपालिकेच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या बिलकुल मिळत नाहीत आणि पावलो पावली सुविधांसाठी लाच मागितली जाते. सोसायटी मध्ये सुविधा पुरवठा जेवढा तेवढाच सारखा टॅक्स पाहिजे. रस्ते, पाणी, ड्रेनेज लाइन, दररोज कचरा उचलणे इत्यादी सुविधा नागरिकांना मिळाल्यानंतर मिळकत कर वाढविला किंवा वसूल केला तरी चालला असता; पण सुविधाच नाही , त्यात मिळणारी मिळकत कर सवलत ही नाही , तिथे कर कसा काय भरणार, असे सातकर यांनी पालिका प्रशासन यांना सांगितले.