मास्क घालत नसाल तर करावी लागेन रस्त्यावर साफसफाई…

0
318

मुंबई,दि.२४(पीसीबी) – सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्याविरोधात मुंबई महापालिकेच्यावतीने अधिक कठोर भूमिका घेण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातलेल्या व्यक्तीने जर २०० रुपये दंड भरण्यास नकार दिला किंवा यासाठी वाद घातला, तर आता त्या व्यक्तीस तासभर रस्ता झाडावा लागू शकतो किंवा भिंतींवरील चित्र साफ करण्याची शिक्षा देखील होऊ शकते.

ही शिक्षा बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन उप-कायद्यांनुसार लागू केली जाईल. ज्यानुसार रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून सार्वजिक कामं करून घेण्याचा अधिकार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान अधिकाऱ्याने हे देखील सांगितले आहे की, नियम मोडणारे जे व्यक्ती ही कामे करण्यास नकार देतील, त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल होऊ शकते. मास्क न घालणारे अनेकजण २०० रुपये दंड भरण्यास नकार देत असल्याचे दिसून येत असल्याने व नियमांचे केले जाणारे उल्लंघन रोखण्यासाठी, प्रशासनास अशा प्रकारची सार्वजनिक कामं त्या व्यक्तींकडून करून घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.