जोपर्यंत जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही – मेहबुबा मुफ्ती

0
253

श्रीनगर,दि.२४(पीसीबी) – “जोपर्यंत जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही” ,असं वक्तव्य जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. श्रीनगर मधील गुपकर रोडवरील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मेहबुबा मुफ्ती पीडीपीचा झेंडा आणि जम्मू काश्मीरचा ध्वज घेऊन सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान मेहबुबा मुफ्ती यांनी भारतीय झेंड्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जम्मू काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी उपराज्यपालांकडे केली आहे. “उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या देशद्रोही वक्तव्याची दखल घेऊन त्यांना अटक करावी”, अशी मागणी रैना यांनी केली आहे.

“काश्मीरच्या जनतेला भडकावण्याचे काम मेहबुबा मुफ्ती यांच्या सारख्या नेत्यांनी करु नये. येथील शांतता आणि बंधुभावाला तडा जावू देणार नाही. जर काही चुकीचे घडले तर त्यांना परिणाम भोगावे लागतील” असा इशारा भाजप नेते रवींद्र रैना यांनी दिला.