मावळ लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार नशीब आजमावणार; चार अर्ज बाद आणि सात जणांची माघार

0
940

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या एकूण ३२ जणांपैकी चार जणांचे अर्ज बाद झाले असून, सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता मावळच्या रिंगणात एकूण २१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत एकूण ३२ जणांनी आपले अर्ज निवडणूक विभागाकडे सादर केले होते. आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर त्यातील ४ अपक्षांचे अर्ज बाद ठरले.

त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी १२ एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत हिंदुस्थान जनता पार्टीचे भीमराव कडाळे, बळीराजा पार्टीचे संभाजी गुणाट तसेच अपक्ष जाफर चौधरी, धर्मपाल तंतरपाळे, नूरजहाँ शेख, डॉ. मिलिंदराजे भोसले, प्रकाश लखवाणी या सात जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

३२ पैकी ४ अर्ज बाद आणि सात जणांनी माघार घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता एकूण २१ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, बसपाचे संजय कानडे, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे सुनील गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरीनाथ पाटील, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदीश सोनवणे, आंबेडकर राईट्स पार्टी ऑफ इंडियाच्या जया पाटील, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश महाडीक, भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन पाटील.

या राजकीय पक्षांसोबतच अजय लोंढे, अमृता आपटे, नवनाथ दुधाळ, प्रशांत देशमुख, बाळकृष्ण घरत, राकेश चव्हाण, राजेंद्र काटे, विजय रंदिल, सूरज खंडारे, सुरेश तौर, डॉ. सोमनाथ पौळ यांचा समावेश आहे.