शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरेंच नाव चिठ्ठीत लिहून वृध्द शेतकऱ्याची आत्महत्या

0
919

उस्मानाबाद, दि. १२ (पीसीबी) – “उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले”, अशी सुसाईड नोट लिहून एका वृध्द शेतकऱ्यांनी शेतातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या सुसाईड नोटमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे देखील नाव आहे.

दिलीप ढवळे (वय ५९, रा. कसबे तडवळे, उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिलीप ढवळे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे पत्र सापडले आहे. ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या दोघांनी जी फसवणूक केली त्याचमुळे आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देवूनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.

दरम्यान कसबे तडवळे येथील शेतकर्‍याने फसवणुकीतून आत्महत्या केली असल्याची माहिती प्राप्त होताच कर्मचार्‍यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. त्यांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांच्या समक्ष ताब्यात घेतल्या आहेत. कुटुंबीयांचा जबाब नोंदवून प्रकरणाची खातरजमा केली जाईल. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांनी सांगितले.