मावळ लोकसभा मतदारसंघातून अजितदादा पुत्र पार्थ पवारला राष्ट्रवादीकडून मैदानात उतरवणार?

0
5803

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद असली तरी पक्षातील बेदिलीमुळे उमेदवार विजयी होत नाही. त्यामुळे मावळ मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून मैदानात उतरवण्याची राजकीय खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत पक्ष पातळीवर चर्चाही झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे मावळ मतदारसंघातून पार्थ पवार मैदानात उतरल्यास या मतदारसंघातील राजकीय संदर्भ पूर्णपणे बदलणार आहेत. गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या मदतीने लोकसभेचे मैदान मारलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचा मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये समावेश होतो. शहरातील ७५ टक्क्यांहून अधिक भाग मावळ लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवडमधून मोठे मताधिक्य मिळते, त्याच उमेदवाराचा विजय निश्चित होतो. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या शहरावर स्वतः अजितदादा पवार यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले आहे. परंतु, २०१४ पासून अजितदादांच्या पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे. आधी विधानसभा, लोकसभा आणि नंतर महापालिकाही गमावण्याची वेळ अजितदादांवर आली. हे सर्व पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे झाले. सध्या शहरावर भाजपचे पर्यायाने आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व आहे.

या राजकीय पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात कोण कोण संभाव्य उमेदवार असतील, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवसेनेने मावळ मतदारसंघ सलग दोनवेळा जिंकला आहे. सध्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. ते दुसऱ्यांदा या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. परंतु, भाजपसोबत युती न झाल्यास मावळ मतदारसंघात शिवसेनेला आता विजय मिळणे कठिण आहे. त्यामुळे भाजपसोबत युती व्हावी यासाठी खासदार बारणे हे देव पाण्यात घालून बसले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवड, पनवेल या दोन मोठ्या महापालिकांसह लोणावळा, तळेगावदाभाडे या नगरपालिका आणि ग्रामपंचायती भाजपने काबिज केलेल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची राजकीय स्थिती भक्कम आहे. तरीही भाजपची सर्व मदार पिंपरी-चिंचवड शहरावर असणार आहे. शहरातून जास्तीत जास्त मते घेण्याचा भाजपचा इरादा असेल. या मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे निवडणुकीच्या मैदानात असतील, अशी राजकीय अटकळ बांधली जात आहे. या मतदारसंघात भाजपखालोखाल राष्ट्रवादीची ताकद आहे. दुसऱ्या क्रमांकाची राजकीय ताकद असणाऱ्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत प्रचंड राजकीय संभ्रम आहे.

राष्ट्रवादीचे शहारध्यक्ष संजोग वाघेरे यांचे एकमेव नाव मावळच्या मतदारसंघात चर्चेत आहे. परंतु, राष्ट्रवादीकडून मावळ मतदारसंघात उमेदवार देताना राजकीय धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजितदादा पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनिती सुरू आहे. त्याबाबत पक्ष पातळीवर चर्चाही झाल्याचे समजते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीतील गटबाजी थोपवून मावळ मतदारसंघात विजय मिळवायचा असेल, तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीशिवाय पर्याय नसल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात अजितदादांचे पूत्र पार्थ पवार राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्यास आश्चर्य वाटायला नको.

तसे झाल्यास या मतदारसंघातील राजकीय संदर्भ पूर्णपणे बदलणार आहेत. गेल्यावेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार असला तरी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मोठी मदत झाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत स्वतः अजितदादांचे पुत्र मैदानात उतरल्यास राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने पक्षाचेच काम करतील. त्यामुळे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना आगामी निवडणुकीत अडचणींचा सामना करावा लागले. दुसरीकडे या मतदारसंघात भाजप प्रथम क्रमांकावर असली, तरी अजितदादांचे पुत्र मैदानात असल्यास विजयासाठी झुंजावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.