मावळ मतदारसंघात २२ लाख ९७ हजारपैकी १३ लाख ६६ हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

0
708

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील २२ लाख ९७ हजार ४०५ मतदारांपैकी १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २ लाख ९८ हजार ३४९ मतदारांनी मतदान केले आहे. त्याखालोखाल चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २ लाख ८३ हजार ४ मतदारांनी मतदान केले आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात २ लाख ११ हजार ३८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे या तीन विधानसभा मतदारसंघात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतदान मिळेल, त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) मतदान पार पडले. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या २२ लाख ९७ हजार ४०५ आहे. त्यातील ५९.४९ टक्के मतदारांनी म्हणजे १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी मतदान केले आहे. मावळ मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी आणि मावळ, तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहा विधानसभा मतदारसंघात कोणत्या राजकीय पक्षाची ताकद आहे आणि तेथून किती मतदान होते, यावरच मावळचा खासदार ठरणार आहे.

पनवेल मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. या मतदारसंघात एकूण ५ लाख ३९ हजार १८७ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ९८ हजार ३४९ (५५.३३ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख २ हजार ७४० मतदार आहेत. त्यातील २ लाख ८३ हजार ४ (५६.२९ टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. त्याखालोखाल मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ३७ हजार ६५७ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ११ हजार ३८३ (६२.६० टक्के) मतदारांनी मतदान केले आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ४७ हजार ७५८ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ८९ हजार ४०४ (५०.७४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याशिवाय कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ७९ हजार ७९० मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ८९ हजार ५७७ (६७.७६ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ९० हजार २७३ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ९५ हजार १०१ (६७.२१ टक्के) मतदारांनी मतदान केले आहे.