राहुल गांधींना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून नोटीस; अडचणी वाढण्याची शक्यता

0
485

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने  राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.   

राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने काही दिवसांपूर्वीच उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला असला तरी या प्रकरणात राहुल गांधी यांच्या अडचणी  वाढण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी ‘ब्लॅक ऑप्स लि.’ या कंपनीच्या कागदपत्रांवर ब्रिटनचा नागरिक असल्याचे म्हटल्याचा आरोप आहे. भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा असून या प्रकरणी केंद्राने राहुल यांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी  सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती.  राहुल गांधी यांना नोटीस बजावली  असून त्यांच्याकडून काय उत्तर दिले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.