मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजपमधील गुंता सुटता सुटे ना; मुख्यमंत्री शिष्टाई करणार

0
945

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळविण्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि. २) आमदार जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासोबत असलेल्या मतभेदांविषयी चर्चा केली. आमदार जगताप यांनी मावळचा उमेदवार बदलण्यात यावा, अशी आपली भूमिका असल्याचे सांगितले. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारातच अंतिम तोडगा काढण्याचे बैठकीत निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री यशस्वी शिष्टाई करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युतीच्या जागा वाटपात मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मावळ मतदारसंघात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा अधिक आहे. भाजपच्या मदतीशिवाय शिवसेना उमेदवाराचा विजय होणे अवघड आहे. त्यातच श्रीरंग बारणे आणि भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यापासून आमदार जगताप व भाजप नगरसेवकांनी बारणे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी लावून धरली होती. बारणे यांना महापालिका निवडणुकीत चार नगरसेवक सुद्धा निवडून आणता आलेले नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेला पुन्हा उमेदवारी दिली आणि शिवसेनेचा पराभव झाल्यास भाजपला जबाबदार धरण्यात येऊ नये, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

त्याकडे दुर्लक्ष करून शिवसेनेने पुन्हा बारणे यांनाच उमेदवारी दिली. त्यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. बारणे यांना उमेदवारी दिल्याने भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच भाजप नगरसेवकांनी महायुतीच्या प्रचारापासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे. तसेच शिवसेनेकडून विश्वासात घेतले जात नसल्यामुळे देखील मावळ मतदारसंघात भाजप फारसा सक्रिय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेच्या काही नेत्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. परंतु, आमदार जगताप हे मावळचा उमेदवार बदला या भूमिकेवर ठाम आहेत. बारणे हे सुद्धा भाजपसोबत जुळवून घेत असल्याचे वरून दाखवत असले, तरी आतून त्यांनी आपल्यातील ताठर भूमिका कायम ठेवत नमते न घेण्याची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे मावळ मतदारसंघातील महायुतीच्या एकत्र प्रचाराचा तिढा कायम आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. आमदार जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार हेही उपस्थित होते. या भेटीत देखील आमदार जगताप यांनी शिवसेनेने मावळचा उमेदवार बदलावा, अशी पुन्हा मागणी केली. मंत्री महाजन यांनी बारणे यांच्यासोबत असलेल्या मतभेदांची आमदार जगताप यांच्याकडून माहिती घेतली. तसेच या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारातच अंतिम तोडगा काढण्याचे बैठकीत निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी शिष्टाई करतात का? आणि भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रित प्रचारात सहभागी होतील का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.