मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनिल शेळके जायंट किलर; बाळा भेगडेंचा ९३ हजार ६१२ मतांनी केला पराभव

0
1029

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मावळ मतदाकरसंघात भाजपचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्यामध्ये काट्याची लढत झाली होती. अखेर सुनिल शेळके जायंट किलर ठरले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. शेळके यांनी १ लाख ६७ हजार १४१ मते घेत विजय मिळवला. तर बाळा भेगडे यांनी ७३ हजार ५२९ मते घेतली.

बाळा भेगडे यांनी सलग तीनवेळा मावळ लोकसभा मतदार संघातून निवडून येत भाजपचा बालेकिल्ला शाबूत ठेवला होता. त्याची शाबासकी म्हणून त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. सुनिल शेळके भाजपमधून यावेळी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु भाजपने पुन्हा एकदा बाळा भेगडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी देत शेळके यांना डावलले होते. त्यामुळे शेळके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देत रिंगणात उतरवले होते.

मतदारसंघात शेळके यांचा वैयक्तिक पातळीवर कामे केली आहेत. तसेच त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. स्वखर्चातून त्यांनी अनेक उपक्रम राबवून संघटना बांधली आहे. पण राज्यमंत्री असलेले बाळा भेगडे यांच्यासमोर त्यांचा निभाव लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिलेली ताकद आणि शेळके यांचा वैयक्तिक करिष्मा या जोरावर  शेळके यांनी तब्बल ९३ हजार ६१२ मतांनी बाळा भेगडेंना चितपट केले.