मावळमध्ये कमळ फुलणार, वृत्तवाहिन्यांचा अंदाज; लक्ष्मण जगताप किंगमेकरच्या भूमिकेत, शिवसेनेची धडधड वाढली

0
12073

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत युती न झाल्यास मावळ मतदारसंघात भाजपचे “कमळ” फुलणार असल्याचे वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. युतीबाबत अद्याप कोणतीही हालचाल होत नसताना वृत्तवाहिन्यांनी वर्तविलेल्या या निवडणूकपूर्व अंदाजामुळे पिंपरी-चिंचवडचा एक खासदार नक्कीच भाजपचा असणार, हे स्पष्ट होत आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप मावळ मतदारसंघात “किंगमेकर”च्या भूमिकेत आहेत, हेही यावरून सिद्ध होत आहे. वृत्तवाहिन्यांच्या या सर्वेक्षणामुळे पिंपरी-चिंचवड भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून, शिवसेनेची मात्र धडधड वाढली आहे. वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे दुसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम अगदी जवळ आले आहे. दोन-अडीच महिन्यात आचारसंहिता लागू होईल. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या सर्व मतदारसंघात काय राजकीय समीकरणे आहेत आणि आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी कोणते डावपेच वापरले पाहिजेत, याबाबत राजकीय पक्षांमध्ये मंथन सुरू आहेत. प्रसारमाध्यमे सुद्धा ४८ मतदारसंघातील राजकीय स्थितीवरून कोणत्या राजकीय पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो, याचा अंदाज बांधत आहेत. जवळजवळ सर्वच मराठी वृत्तवाहिन्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती झाली, तर आणि युती तुटली, तर कोणत्या मतदारसंघात कोणत्या राजकीय पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो, याबाबत सर्वेक्षण केले आहेत.

भाजप आणि शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास मावळ मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार असल्याचे सर्वच वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. निवडणुकीत युती झाली, तरच मावळमध्ये शिवसेनेचा विजय होऊ शकतो, असा या निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज आहे. त्यामुळे युती झाली तर शिवसेनेकडून मावळ मतदारसंघ मिळावा यासाठी भाजपचा प्रयत्न असणार आहे. या मतदारसंघात निश्चितच भाजपने आपली मजबूत राजकीय पकड निर्माण केलेली आहे. त्यात आता वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणामुळे मावळ मतदारसंघात भाजपचे बळ आणखी वाढणार आहे. वृत्तवाहिन्यांच्या या सर्वेक्षणामुळे पिंपरी-चिंचवडचा भाजपचा पहिला खासदार मावळ मतदारसंघाचा असेल, हे स्पष्ट होत आहे.

या सर्व राजकीय परिस्थितीत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे मावळ मतदारसंघात किंगमेकर बनले आहेत. जगताप यांनी मावळ मतदारसंघात लढण्याची जोरदार तयारी ठेवली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची प्रचंड गर्दीची जाहीर सभा घेऊन आमदार जगताप यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. भाजपने वाढत्या राजकीय ताकदीमुळे मित्रपक्ष शिवसेनेत धडधड वाढली आहे. सलग दोनवेळा जिंकलेला मावळ मतदारसंघ आगामी लोकसभा निवडणुकीत हातातून निसटेल, याची शिवसेनेला भिती वाटत आहे. वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे दुसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेने मावळची जागा भाजपला दिली, तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे कोणता राजकीय निर्णय घेणार याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचीही मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे खासदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. तशी तयारीही त्यांनी केली आहे. आता घोडा मैदान जवळ आले आहे. “आ जाओ मैदान में” असे चॅलेंज दिले जाईल. त्यामुळे मावळच्या मैदानात कोणत्या राजकीय पक्षांकडून कोण कोण उतरणार आणि मतदार या मैदानावर कोणाचा गेम करणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.