मालकाने उचल दिली नाही म्हणून कामगाराने दुकान पेटवले

0
443

थेरगाव, दि. ३ (पीसीबी) – मालकाने उचल दिली नाही म्हणून कामगाराने चक्क दुकान पेटवून दिले. यामध्ये आजूबाजूची दुकाने देखील जळाली. ही घटना गुरुवारी (दि. 2) पहाटे तीन वाजता दत्त नगर, थेरगाव येथे घडली.

प्रकाश शंकरराव सोनकांबळे (रा. खंडरे गल्ली, ता. भालकी, जि. बिदर) असे दुकान पेटवणा-या कामगाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी दुकान मालक शंकर लक्ष्मण सोनवणे (वय 51, रा. नखातेनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचे दत्त नगर, थेरगाव येथे ओम साई कुशन वर्क नावाचे दुकान आहे. आरोपी प्रकाश दुकानात काम करत होता. त्याने फिर्यादी यांच्याकडे उचल (कामाचे आगाऊ पैसे) मागितली होती. उचल देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला होता. गुरुवारी पहाटे प्रकाशने दुकान आतून बंद केले. ‘मी तुला पैसे मागितले होते. तू मला पैसे दिले नाहीत ना, बघ आता मी काय करतो’, असे म्हणत शिवीगाळ करून त्याने दुकानाला आग लावली.

या आगीत फिर्यादी यांच्या मुलाच्या दुकानातील फोम बनविण्याचे मटेरियल, तयार असलेले ऑर्डरचे फोम असे एकूण तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ही आग आजूबाजूच्या दुकानात पसरल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.