“मातृभूमीचे ऋण सर्वात मोठे!”

0
244

पिंपरी, दि.१६(पीसीबी ) “जन्मापासून माणसावर मातृऋण, पितृऋण, गुरुऋण आणि मातृभूमीचे ऋण असते. यांमध्ये मातृभूमीचे ऋण सर्वात मोठे असल्याने प्रत्येकाने शिकून स्वावलंबी झाल्यावर या ऋणांमधून उतराई होण्याचा प्रयत्न करावा!” असा उपदेश ज्येष्ठ साहित्यिका आणि वास्तुविशारद उल्का खळदकर यांनी संत तुकाराम उद्यान, पेठ क्रमांक २७अ, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांना केला. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख वक्त्या या भूमिकेतून उल्का खळदकर यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष चांदबी सय्यद, कार्याध्यक्ष डॉ. अर्चना वर्टीकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शैलजा मोरे यांनी आपल्या मनोगतातून, “स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी जोमाने प्रयत्न करा; पण कोणत्याही गैरमार्गाने यश मिळवू नका!” असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

उल्का खळदकर यांनी आपल्या व्याख्यानातून सचिन तेंडुलकर यांचा क्रिकेटपटू ते भारतरत्न पुरस्काराने सन्मानित नागरिक हा जीवनप्रवास कथन करताना, “कोणत्याही क्षेत्रांत आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने माणूस मातृभूमीचे ऋण फेडू शकतो!” असे प्रतिपादन केले. या प्रसंगी शहरातील दहावी आणि बारावीतील सर्वोत्तम तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांच्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालोपयोगी साहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आले. चांदबी सय्यद यांनी प्रास्ताविक केले; तर डॉ. अर्चना वर्टीकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. पालकांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केलीत. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी संयोजनात परिश्रम घेतले. चंद्रशेखर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. शुभदा मेंगळे यांनी आभार मानले. सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.