माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी असताना मला ईडीची कसली भीती – खासदार उदयनराजे

0
784

सातारा, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरून गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच एकाने उदयनराजे भोसले यांना तुम्हालाही ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये जाण्यास भाग पाडण्यात येत आहे का,’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उदयनराजेंनी मिश्किलपणे उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी असताना मला ईडीची भीती कशी वाटेल.  उदयनराजें हे वक्तव्य सोशल मिडीयामध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. तर काही नेत्यांनी ‘ईडी’च्या भीतीमुळे भाजपात प्रवेश केला आहे, असे विरोधकांकडून सांगितले जात आहे.

त्यामुळे उदयनराजे भोसले देखील ‘ईडी’ला घाबरूनच भाजपात प्रवेश करत आहेत का? असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र उदयनराजेंनी आपल्या शैलीत या प्रश्नाला टोलवून लावले. यामुळे उदयनराजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.