माझी युती तोडण्याची इच्छा नाही, भाजपाने काय तो निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे

0
398

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मला युती तोडायची नाही, त्यामुळे भाजपाने काय तो निर्णय घ्यावा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मातोश्रीवर आमदारांची बैठक पार पडली असून उद्धव ठाकरे अद्यापही मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. यामुळे भाजपा आणि शिवसेनेमधील तिढा अजून वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची युती करताना जे ठरले होते ते व्हावे, बाकी काही अपेक्षा नाही असे सांगत मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनच्या सर्व आमदारांना रंगशारदा येथे मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पदावर ठाम असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे शिवसैनिक, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील असेही ते म्हणाले.

शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी आमदार फोडण्यासंबंधी विचारले असता, कोणी माई का लाल आम्हाला फोडू शकत नाही. ही भाजी मंडई आहे का असे सांगत कोणीही आमचे आमदार फोडू शकत नाही असा विश्वास व्यक्त केला.

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील. आम्ही उद्दव ठाकरे यांना तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाल मान्य असेल असे सांगतिले आहे. लवकरात लवकर निर्णय कळवण्यात येईल,” अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली आहे.