शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार – सुधीर मुनगंटीवार

0
357

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. शिवसेना आमचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करत असून यासंबंधी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी, “देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस शिवसैनिक आहेत असे उद्दव ठाकरेंनी म्हटले होत, त्यामुळे शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार,” असे म्हटले. युती व्हावी हीच आमची इच्छा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

भाजपाने सरकार स्थापण्याची सारी तयारी केली आहे. शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर २०१४ प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. शिवसेना आता सरकारमध्ये सहभागी झाली नाही तरी पुढील १५ दिवसांनंतर सरकारमध्ये सहभागी होईल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. पुढील दोन-तीन दिवसांत सरकार स्थापण्याची योजना असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात अल्पमतातील सरकार बसवण्याची कोणतीही योजना नसून शिवसेना-भाजपाचे स्थिर सरकार देणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत आज सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.