माजी महापौर संजोग वाघेरे शिवसेनेत, उध्दव ठाकरेंची घेतली भेट

0
687

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : उपमुख्यंमत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. वाघेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पवार गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे हे इच्छुक आहेत. दरम्यान, वाघेरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संदीप वाघेरे यांनी यापूर्वीच मावळ लोकसभा मतदारसंघातून संपर्क अभियान सुरू केल्याने आता रंगत वाढली आहे.

माजी महापौर संजोग वाघेरे हे २००९ पासून मावळ लोकसभा मतदारसंघातून प्रयत्न करत होते. वारंवार त्यांना आश्वासनांच्या पलिकडे काहीच मिळाले नाही. यावेळी शिवसेना शिंदे गटाला महायुतीमधून ही जागा मिळणार असून तिथे मावळते खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने वाघेरे यांनी सरळ मातोश्री गाठली.
मातोश्रीवर झालेल्या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत, राज्य संघटक एकनाथ पवार, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, योगेश बाबर उपस्थित होते.
संजोग वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मागील वेळी त्यांनी जोरदार तयारी केली होती. पण, ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सुटण्याची शक्यता असल्याने वाघेरे यांनी ठाकरे गटाच्या पर्यायाची चाचपणी सुरु केल्याचे दिसते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे हे अजित पवार यांच्यागटात होते. पवार शहरात असतानाच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता आहे. वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.